न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हें) :- शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय पश्चिम महाराष्ट्र विभागीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष, उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सडेतोड वक्ते म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांनी कधीही बोललेला शब्द फिरवला नाही. हा त्यांच्या वक्तृत्वाचा खंबीर असा बाणा होता. वक्तृत्व हे नेतृत्व गुणाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे या स्पर्धांमधून चांगले वक्ते निर्माण होऊन शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारे नेतृत्व निर्माण होण्यास मदत होणार आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ॲपचा मारा लोकांवर सातत्याने होत आहे.यामुळे फेक न्यूजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे सोशल मिडीयावरचा लोकांचा विश्वास कमी होत आहे. भविष्यात वाचन व लोकसंवादाकडेच वळावे लागणार आहे.” वक्त्यांनी काय बोलू नये हे नियम जरी पाळले तरी पुष्कळ झाले, असे सांगत भाषण कौशल्याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे, आमदार गौतम चाबुकस्वार, बारामती संपर्कप्रमुख सत्यवान उभे, नांदेड संपर्कप्रमुख दीपक शेडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, खडकवासला विधानसभा संघटीका भावना थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात, राजू खांडभोर, अनंत कोऱ्हाळे ,रोमी संधू, संतोष सौंदणकर, अनिता तुतारे, शर्वरी जळमकर, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन बोंडे, महेश बारसावडे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या भागातील वक्ते असणाऱ्या ८८ शिवसैनिकांनी स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी १८ विविध ज्वलंत विषय देण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धकास ५ मिनिटे व अधिक २ मिनिटे अशी ७ मिनिटाची वेळ देण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मीकांत पांडे, प्रदीप मोरे, दीपक जाधव यांनी केले. हि वक्तृत्व स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी सायन्स पार्क हॉल, ऑटो क्लस्टर समोर, चिंचवड स्टेशन येथे संपन्न झाली. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे.
या स्पर्धेचे प्रास्ताविक शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केले. तसेच चिंचवड विधानसभेचे संघटक संतोष सौंदणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे यांनी केले.
















