न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- शहरातील सर्व व्यवहार सुरू केल्यामुळे करोनाबाधितांचा आकडा वाढणार आहे. सध्याचा दुप्पटीचा वेग पाहता जून अखेर शहरात तीन हजारांवर करोनाबाधित रुग्ण असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
शहरा त तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही आस्थापनांना परवानगी दिली होती. तर सार्वजनिक वाहतूकही सुरू केली होती. त्यामुळे नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे शहरातील करोनाचा वेग वाढला आहे. त्यातच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांसह हॉटेलमधील पार्सलही सुरू झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये करोना बाधितांचा आकडा सध्या रोजच अर्धशतकी वाटचाल करत आहे.
सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे शहरवासीयांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. याच विषयाचा खुलासा करताना आयुक्तांनी जून अखेर तीन हजारांच्या आसपास करोना रुग्णांची संख्या शहरात असेल, असे भाकित वर्तविले आहे. सध्या दहा दिवसांमध्ये दुप्पट रुग्ण होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे खुले झालेले व्यवहार आणि बाजार पाहता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे रुग्णांमध्ये वाढ होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.














