न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- टाटा उद्योगाचे सर्वेसर्वा उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारला सर्वतोपरी मदत केली. पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकीकात भर टाकणारा टाटाचा मोठा उद्योग समूह आहे. रतन टाटा यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला आहे.
रतन टाटा यांनी टाटा उद्योग समुहाच्या वतीने कोरोना लढाईसाठी तब्बल दिड हजार कोटींची मदत केली. मुंबईतील हॉटेल ताज विनामोबदला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भरीव अशी मदत केली. उद्योग, व्यवसाय व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव पालिका सभेत मंजुर करण्यात आला. हा प्रस्ताव उपमहापौर तुषार हिंगे यांनी मांडला. त्याला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले.














