न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पूर्ववैमनस्यातून थेरगाव-जगताप नगर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री पावणेआठच्या सुमारास तीन तरुणांनी एका २० वर्षीय तरुणाला कोयत्याने मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संबंधित तरुणाला उपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार आरोपींना १२ तासांत जेरबंद करण्यात आले आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.
गुड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. लिंक रोड, चिंचवड), सिजीन फिलिप जार्ज (वय २६, रा. काळेवाडी), रोहीत ललन सिंग (वय २२, रा. पवनानगर कॉलनी क्र. २, काळेवाडी), सचिन सोनू साठे (वय २६, रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषभ गायकवाड ( वय २८ ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद किसन गायकवाड (रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ ऋषभ गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून बदला घेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपी यांनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर जबर वार करून व दगडाने मारून जीवे ठार मारले. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा माग काढून १२ तासांत आरोपींना अटक करण्यात आली आहे.


















