- भोसरी, आनंदनगर, वाकड, बौध्दनगर, पिंपरी, किवळे, भाटनगर, अशोकनगर पिंपरी, दापोडी, कासारवाडीतील रुग्ण कोरोनामुक्त…
- आंबेगावमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी रात्री हाती आलेल्या अहवालानुसार तीस जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात १८ पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील खेड, जुन्नर, डेक्कन पुणे, येरवडा, शिवाजीनगर, देहूरोड व चाकण येथील आठ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. आज आंबेगावमधील ६४ वर्षीय वृद्धाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरात सक्रीय रुग्णांची संख्या ७०८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २५१ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर, पिंपळेगुरव, बौध्दनगर, सांगवी, भाटनगर, बॉईज हॉस्टेल वायसीएम रुग्णालय, अजंठानगर, गुरुदत्तनगर पिंपरी, लिंकरोड पिंपरी, जनतानगर चिंचवड, रुपीनगर, दत्तनगर वाकड, चिंचवड, आनंदपार्क निगडी, खराळवाडी, दापोडी येथील रहिवाशी आहेत.
आज भोसरी, आनंदनगर, वाकड, बौध्दनगर, पिंपरी, किवळे, भाटनगर, अशोकनगर पिंपरी, दापोडी, कासारवाडी, आंबेगाव, खेड व शिक्रापूर येथील कोविड बाधित रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


















