- नामदाराच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा प्रभागातील समस्या सोडवा
- राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा पलटवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवक कलाटे बंधूंकडून मारहाण झाली. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून, मडिगेरी यांना मारहाण करणाऱ्यांना एक प्रकारे आणखी कोणताही गुन्हा करण्यास मोकळे सोडले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत दादागिरी आणि गुंडगिरीच करायची असेल, तर त्यांना यापुढे आमच्याकडूनही त्याच भाषेत उत्तर मिळेल, असा इशारा भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी दिला आहे. मुळात हा स्थानिक विषय आहे. राज्य सरकारवर आसूड ओढण्याचा शहर भाजपच्या नगरसेवकाला व त्या पक्षाला नैतिक अधिकार उरला कुठे? असा सवाल उपस्थित करीत, भाजप नगरसेवक कस्पटे यांच्या इशाऱ्याला पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार पलटवार करून, शहर भाजपची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
पत्रकात कस्पटे यांनी म्हटले आहे की, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना १ जून रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बेदम मारहाण झाली. मुळात ही मारहाण नाहीच. शहरातील विकासाच्या मुद्यावरून या तिघांमध्ये मतभेद होते. थोडक्यात बाचाबाची झाली. मात्र, शहर भाजपने या विषयाला सुरुंगच लावला. हा सुरुंग वडच्या नामदाराकडून लागला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे विलास मडिगेरी मारहाण प्रकरण पूर्णपणे बनाव आहे. कलाटे बंधूंची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचे षडयंत्र आहे. भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते धूर्त आणि कपटी, षडयंत्र रचण्यात माहिर असल्यामुळे मडिगेरी यांनाच धोका असून, त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे. त्यामुळे हा विषय शहर पातळीवरच सोडवला पाहिजे. राष्ट्रवादी हा सुसंस्कृतपणा जपणारा पक्ष आहे. मात्र, तो भाजपचा नामदार नगरसेवकाच्या खांद्याचा वापर करून, राज्य सरकारला बदनाम करू पाहतोयं. आगामी निवडणुकांना समोर ठेवून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजप रचतयं. हे आम्ही खपवून घेणार नाही.
राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पक्ष कार्यालयावर हल्ला झाला. त्यावेळी कुठे होता हा नगरसेवक व त्याचा पक्ष व तो नामदार. भाजपचे दोन आमदार, एक खासदार व नगरसेवक मुग गिळून गप्प होते. नैतिकतेच्या गोष्टी आम्हालाही कळतात. त्यामुळेच आमच्या पक्षाच्या अध्यक्षाने सर्वप्रथम पोलिसांना निवेदन देऊन मडिगेरींना संरक्षण देण्याची मागणी केली. राहूल कलाटे व मयूर कलाटे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तरुण लोकप्रतिनिधी आहेत. मोठे कट-कारस्थान रचून या दोघांना राजकारणातून संपविण्याचा डाव त्या नामदारासह भाजपचे काही प्रमुख लोक करीत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पारदर्शकपणे या प्रकरणाचा छडा लावावा. मात्र, शहर भाजपने राज्य सरकारवर विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नयेत. निर्वाणीचा इशारा आम्हालाही देता येतो. दादागिरी आणि गुंडगिरीच्याच भाषेत आम्हालाही उत्तर देता येते. तुमचा बोलविता धनी कोण आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्याच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा प्रभागातील विकासकामांना प्राधान्य द्या. घोडेमैदान दूर नाही, असा इशारा ज्ञानेश्वर कस्पटे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.