न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर आणि त्यांचे पोलीस कर्मचारी चिखली परिसरात रस्त्यावर होणाऱ्या चोरीच्या आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांच्या अनुषंगाने गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलीस शिपाई किरण काटकर यांना माहिती मिळाली की, कृष्णानगर चिखली येथे नवनाथ रसवंती गृहासमोर एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्टलसारखे शस्त्र आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णानगरकडे धाव घेतली.
परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा ऐवज सापडला. पोलिसांनी हा ऐवज जप्त करून आरोपीला अटक केली. अमोल बसवराज वाले (वय २२, रा. इंदिरानगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमोल याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१८ साली निगडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा एक आणि भोसरी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.











