- यंदा वृक्षांची लागवड करून, त्या भोवती प्रदक्षिणा घाला; संस्थानचे दिंडी चालकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८. जून. २०२०) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर यावर्षी करोना संसर्गाचे सावट असल्याने यंदा पायी पालखी सोहळा होणार नाही, शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सोहळा होईल. आषाढीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज यांच्या ३३५ व्या पालखी सोहळ्याचे १२ जून रोजी प्रस्थान होणार आहे. या प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, पालखी प्रस्थानपूर्व अखंड हरिनाम सप्ताहाला केवळ १४ टाळकऱ्यांसह शनिवारपासून (दि. ६) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला.
एकादशीच्या दिवशी नेहमीचा उत्साह व गर्दी यंदा असणार नाही. पालखी संस्थानच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. भारतासह जगभरात ‘कोवीड १९’ या व्हायरसचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांच्या समवेत होत आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी प्रथेप्रमाणे पहाटे नित्यपूजेसह आरती, महापूजा पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज, विठ्ठलरुक्मिणी मंदिर व शिळा मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत किंवा शेतात पिंपळ, वड किंवा कडू निंबाची झाडे लावून त्याला प्रतिकात्मक पांडूरंग किंवा पंढरपूर येथील मंदिर समजून प्रदक्षिणा घालाव्यात. या माध्यमातून निसर्गसंवर्धन देखील होईल. पर्यावरणाचे रक्षण हा संदेश देखील सर्वत्र पोहचविण्याचे आवाहन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या ३३५ दिंडी चालकांना संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने अन्य पालखी सोहळ्यातील सहभागी दिंडी चालकांनी देखील कृती करावी. भविष्यात हेच वृक्ष आपत्कालीन परिस्थितीतील आठवणीतील पालखी सोहळ्याची साक्ष देतील यासाठी हे वृक्ष संवर्धन करावे, असे आवाहनही माणिक महाराज मोरे यांनी केले आहे.











