न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२०) :- मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून (दि. ८) दोन सत्रात सुरू करण्यात आले आहे. अकरा ते दोन या वेळेत अत्यावश्यक रिमांड, जामीन या संदर्भात, तर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत उर्वरित कामे, तारखांचे कामकाज सुरू राहणार आहे.
नवीन खटला दाखल करण्यासाठी येथील नाझर कार्यालयाजवळ दोन बॉक्स ठेवण्यात आले आहेत. सकाळी दहा ते दुपारी चार त्याची वेळ आहे. त्यासाठी टोकन देण्यात येत असून, ते खटले अथवा दावे ७२ तासानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येते. तसेच खटल्यासंदर्भात केवळ वकील व पक्षकारांना प्रवेश दिला जाईल. मात्र, तेथील परिसरात कोणालाही थांबता येणार नाही.
न्यायलयातील गर्दी टाळण्यासाठी बार कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. आजारी असलेले व्यक्ती अथवा सर्दी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने न्यायालात प्रवेश करू नये. न्यायालयाचे एकच प्रवेशद्वार खुले असून तेथील नोंदवहीत वकील अथवा पक्षकाराने नोंद करणे अनिवार्य आहे. न्यायालयात जाताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे यांनी दिली.


















