न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील भाजी मंडई तोडून त्या ठिकाणी ५ मजली अद्ययावत व सर्व सुविधायुक्त भाजी मंडई उभारली जाणार आहे. त्यासंदर्भातील सादरीकरण मंगळवारी (दि. ९) पालिका भवनात करण्यात आले. यावेळी महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर यांनी सादरीकरण केले. गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी भाजी मंडईचा विषय रखडला आहे. येथील व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी पिंपरीत अद्ययावत भाजी मंडई उभारली जाणार आहे. सुमारे पावणेतीन एकर जागेत ही मंडई असणार आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून लवकरच परवानगी मिळणार आहे. त्यात ९० भाजी व ७० फळ विक्रेत्यांसाठी गाळे असणार आहेत व सर्व गाळ्याची रचना सुटसुटीत व आकर्षक पद्धतीने असणार आहे. तसेच, मटन, चिकन, मासे, मसाले विक्रेत्यांसाठीही गाळे असणार आहेत. सर्व गाळे अधिकृत विक्रेत्यांना भाडे तत्वाने दिले जाणार आहे. ओला कचरा संकलनसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. ५ मजली इमारतीचे काम एका वर्षात पूर्ण केले व जाणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर पालिका निविदा प्रक्रिया राबविणार आहे.
दरम्यान, मंडईसाठी गेल्या ८ वर्षांपासून पाठपुरावा करणारे माजी आमदार चाबुकस्वार तसेच, खा. बारणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोणाचाही व्यवसाय हिरावला जाणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल. असे नियोजन करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. मंडईत पे अँड पार्किंग’ची सोय केली जाणार आहे.