न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी म्हणजे आज बुधवारपासून (दि. १०) देहूतील मुख्य मंदिराला राज्य राखीव पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी ३३५ वा पालखी सोहळा प्रस्थान तीर्थक्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात शुक्रवारी (दि. १२) दुपारी दोनच्या सुमारास ठेवणार आहे. या पालखी प्रस्थानच्या धार्मिक कार्यक्रमास पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे आजी, माजी अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, विणेकरी, भाविक, वारकरी, शासकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीबाबत अद्याप निर्णय झाला नाही. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती देहु संस्थांनाकडून देण्यात आली आहे.
देहूतील मुख्य मंदिर ३० जूनअखेरपर्यंत भाविकांना दर्शनार्थ बंद आहे. पालखी सोहळा प्रस्थान, तीर्थक्षेत्र देहूहून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे पादुका मार्गस्थ, पुनरागमन आणि पालखी सोहळ्याची १६ जुलैला होणाऱ्या सांगतापर्यंत मुख्य मंदिराला राज्य राखीव पोलिसांच्या दोन तुकड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. हा बंदोबस्त पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी म्हणजेच बुधवारपासून (दि. १०) असणार आहे. – देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याण