न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जून. २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीनं राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेनं रक्तदान करावं आणि सामाजिक कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ‘कोरोना’ च्या साथीमुळे राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.
या अनुषंगाने ही उणीव भरून काढण्यासाठी कर्तव्य भावनेतून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक जाणीवेतून मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे, असा विश्वास शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पिंपरीगाव, वाकड, आकुर्डी, निगडी, उद्यमनगर, भोसरी, चऱ्होली लालटोपीनगर, मोरवाडी अशा विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभाग नोंदवून रक्त संकलन अभियानात आपले योगदान दिले.
या रक्तदान शिबिरास पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, माजी राष्ट्रवादी युवक संघटनेचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल काळभोर, प्रदीप गायकवाड आदी मान्यवर यांनी भेटी दिल्या.


















