न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- देशात ३८० रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ९,९०० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ६७ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ३ लाख, ४३ हजार ०९१ झाली आहे. एकूण रुग्णांपैकी १ लाख ८० हजार १३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.०८ टक्क्यांवर पोहोचले असून, १ लाख ५३ हजार १७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगण आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ही बैठक होणार आहे.
या राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी व सातवी बैठक असेल. यापूर्वी ११ मे रोजी मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.


















