न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून महापालिकेने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरची (कोविड केअर सेंटर) संख्या ११ पर्यंत नेली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले, संशयित, सौम्य लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन करणे सुलभ होणार आहे. तब्बल ५ हजार नागरिकांना या ठिकाणी ठेवता येणार आहे.
मोशी येथील सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थी वसतिगृह, म्हाळुगे बालेवाडी येथील खेळाडूंचे वसतिगृह आणि आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे वसतिगृह येथे अनेक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, शहरात कोरोनाबाधितांची संख्या विशेषतः झोपडपट्टी व दाट लोकवस्तीमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने बाधितांच्या संपर्कास आलेल्यांना आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना क्वारंटाईन कामासाठी सेंटर अपुरे पडत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरची संख्या ये वाढविली आहे.
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे शैक्षणिक संस्थांचे वसतिगृह ताब्यात घेऊन तेथे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात शाहूनगर येथील रिजनल टेलिकॉम सेंटर, किवळेतील सिम्बॉयोसिस महाविद्यालयाचे वसतिगृह, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील मुलांचे वसतिगृह, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे वसतिगृह, वाकड येथील बालाजी विद्यापीठाचे विधी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालयाचे वसतिगृह, म्हाळुगे – चाकण म्हाडा वसाहत येथे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली आहे.