न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हें) :- मांडूळ शेतकर्यांचा मित्र आहे. गुप्तधनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतर गैरसमजुतींमुळे “मांडूळ’ या बिनविषारी सापाची राज्यात बेसुमार तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याच्या तस्करी आणि अंधश्रद्धेमुळे हा साप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
निगडी पोलिसांनी मांडुळाची तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. सैफ रौफ शेख (वय-२३, रा. गणेशनगर, वडगाव), प्रमोद सुनील पाटील (वय-२१, रा. खराडी, पुणे), दिनेश विजय नायर (वय-२७, रा. येरवडा पुणे) व अमर रामदास उदमाले (वय-३१, रा. दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजय सावंत शिंदे (वय-२१, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरकडे जाणाऱ्या रोडवरील तिरुपती हॉटेल जवळ चार इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्यासाठी आल्याची खबर पोलीस शिपाई मिसाळ यांना मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर वन्यजीव संरक्षण १९७२ कायद्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे व कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, संदीप पाटील, विलास केकाण, सतीष ढोले, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, गणेश शिंदे यांनी ही कारवाई केली.










