न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हें) :- आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी भोसरीमध्ये शिक्षक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस शहरातील शिक्षक संघटनांच्यावतीने आमदार लांडगे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांना ”धन्वंतरी आरोग्य विमा योजना” लागू करण्याची मागणी केली होती.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी शिक्षकांना धन्वंतरी आरोग्य विमा योजना लागू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी आयुक्तांकडे लावून धरला होता. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. सभापती सोनाली गव्हाणे यांनी तांत्रिक बाबतीत आयुक्तांच्या शंकेचे समाधान करीत व शिक्षकांच्या जनरेट्याचा विचार करीत या योजनेस मंजुरी देण्याची विनंती आयुक्तांकडे केली होती.
सभापती सोनाली गव्हाणे यांच्या मागणीची दखल घेत, आयुक्तांनी या योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ सुमारे ११०० शिक्षक व ८०० सेवानिवृत्त शिक्षकांना होणार असून, आरोग्य वीमा योजनेचे सर्व फायदे शिक्षकांना मिळणार असल्याचे शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.










