न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १९ नोव्हें) :- सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून, यात त्यांनी बऱ्याच दिवसांपासून विविध भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पाणी प्रश्नासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.
मात्र, महापौर, सभागृहनेता, विविध पक्षाचे गटनेते, आयुक्त, मनपाचे महत्वाचे अधिकारी स्मार्ट सिटी अंतर्गंत स्पेन येथील बर्सिलोना या शहराचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर गेले. तर, अधिकारी दिवाळीची सुट्टी साजरी करीत आहेत. यापूर्वी दिवाळीची सुट्टी व शनिवार रविवार असे ८ दिवस म्हणजे एकूण १५ दिवस आपल्या व पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शहराचा कारभार रामभरोसे चालू आहे. असे असतानाही मागच्या २० दिवसापासून सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी नसतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. यामागचे गौडबंगाल नागरिकांच्या लक्षात येत नाही? हे सर्व संगनमताने नागरिकांना वेठीस धरुन कोणालातरी आपले इप्सित साध्य करण्याकरता जाणीवपूर्व कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली की काय ? अशी शंका भापकर यांनी उपस्थित केली आहे. तेव्हा आयुक्तांनी या पाणी घोटाळ्याची चोकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.
















