न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक शैलेश मोरे व आकाश चतुर्वेदी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर परिसरातील पाच वर्षाखालील लहान मुलांना कपड्यांच्या जोडीचे आज मंगळवारी (दि. 23) रोजी वाटप करण्यात आले.
लाॅकडाउनमुळे सर्वच स्तरावरील उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. बेरोजगारी वाढली. त्यामुळे कोणताही डामडौल न करता वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक शैलेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते, आनंदनगर परिसरातील नागरिक मुलांचे पालक आदि उपस्थित होते.
नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर परिसरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आनंदनगर परिसरात कंटेन्मेंट झोन झाल्यामुळे गेल्या दिड महिन्यांपासून परिसरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अनेकदा नागरिकांचा संयमाचा बांध फुटला. परिसरातील नागरिकांना वेळोवेळी जेवण, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले. आज मंगळवारी आकाश चतुर्वेदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आनंदनगर परिसरात एक हजार सहाशेपेक्षा अधिक नव्या कपड्यांच्या जोडीचे पाच वर्षाखालील लहान मुलांना वाटप करण्यात आले. यापुढेही आनंदनगर परिसरातील नागरिकांना मदतीचा हात देणार असल्याचे नगरसेवक मोरे यांनी सांगितले.