न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- मार्च महिन्यातील 25 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील खेळांची सर्व मैदाने, क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली आहेत. खेळाडूंचा सराव बंद आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. खेळाचा सराव करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे.
उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे तब्बल पावणेतीन महिने झाले शहरातील सर्वच खेळाडूंचा क्रीडा सराव बंद आहे. त्यामुळे त्यांच्या नैराश येण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांची शारीरिक क्षमता, कौशल्य कमी होण्याची भिंती आहे.
सोशल डिस्टन्सिंग ठेऊन सराव करण्यास परवानगी दिल्यास त्यांची शारीरिक तंदुरूस्ती वाढून प्रतिकार शक्ती वाढणार आहे. त्यामुळे ते आजारापासून दूर राहतील. तसेच, त्याचा शारीरिक क्षमता कायम राहण्यास मदत होईल, असे उपमहापौर हिंगे यांचे मत आहे.