- युवा नेते पांडाभाऊ साने यांचे विठ्ठलाला साकडे…
- वाढदिवसानिमित्त मावळातील आश्रमात अन्नधान्य व मास्कचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०३ जुलै. २०२०) :- भारतीय जनता पार्टीचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी चिखली मोरेवस्ती परिसरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. आमदार आणि पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी मावळातील गुरूनानक आनंद आश्रम येथील वृद्धांसाठी मदतीसाठी पुढाकार घेतला. नुकतीच आषाढी एकादशी झाली आहे. आम्हाला पांडाभाऊच्या रुपाने ‘पांडुरंग’भेटला, अशा भावना आश्रमातील नागरिकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर व आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंदा सामाजिक उपक्रम घेत असतानाच वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय साने यांनी घेतला. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गुरू नानक आनंद आश्रमात साने यांच्या पुढाकाराने मदत कार्य करण्यात आले. आश्रमातील वृद्ध नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप, तसेच कोरोनापासून सुरक्षा घेता यावी. याकरिता मास्क आणि सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यातच आमचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांना कोरोनाची बाधा झाल्याची बातमी चार दिवसांपूर्वी समोर आली. त्यामुळे यावर्षी आम्ही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मग, कार्यकर्त्यांनी मावळातील आश्रमामध्ये मदत करण्याचे निश्चित केले. त्याअंतर्गत आम्ही गुरू नानक आश्रमाला भेट दिली. त्यावेळी अन्नधान्य वाटप, फळ वाटप, उबदार ब्लॅकेट आदी वस्तुंची मदत केली. त्याद्वारे गोरगरिबांच्या सदिच्छा मिळाव्यात आणि आमच्या लाडक्या नेत्याला कोरोनारूपी राक्षसाच्या तावडीतून सहीसलामत बाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम घेतला.