- लोकप्रतिनिधींनो एकत्रित येवून मागणी करा; नगरसेवक शैलेश मोरेंचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दिवसाला दोनशे-तीनशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर, दररोज तीन ते चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने किमान पंधरा दिवस कडक संचारबंदी अथवा लॉकडाऊन जाहीर करावा; त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधिनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक शैलेश मोरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून कडक उपाययोजना होणे आवश्यक आहे. रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांकडून संचारबंदीचे पालन केले जात नाही. सर्रास सर्वच बाजारपेठेत गर्दी बघायला मिळत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. नागरिकांकडून मास्क किंवा सुरक्षेच्या साधनांचा देखील वापर होताना दिसून येत नाही. कोरोनापासून महापालिकेचा नगरसेवक देखील सुरक्षित नाही. आजच पालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्याला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला असता शहरात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवर आळा बसणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर कोरोनामुक्त करायचे असेल तर, पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे तीनही आमदार, मावळचे खासदार व सर्वपक्षीय नगरसेवक यांनी एकत्रित येवून पिंपरी चिंचवड शहरात पंधरा दिवस कडक लॉकडाऊन / कडक संचारबंदीची एकमुखी मागणी करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना आजार असलेल्या रुग्णाचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता येतील. सद्यस्थितीत रुग्ण संख्या वाढत असताना संचारबंदी व लॉकडाऊनची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर सध्यातरी कडक लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.