न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- चिखली येथील ताम्हाणे वस्ती, गणेश हौसिंग सोसायटीमधील गट नं. १५१९ व १५२० या ठिकाणी वहिवाटीच्या रस्त्यामध्ये सतीश म्हेत्रे यांनी अनधिकृत पत्राशेडचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वहिवाटीसाठी अडथळा निर्माण झाला.
त्याबाबत शहर शिवसेनेचे युवा नेते रावसाहेब थोरात व स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २ जुलै) रोजी जागेचे कागदपत्रे तपासून अनधिकृत बांधकाम काढण्यात येईल, असे आश्वासन स्थानिकांना दिले आहे.
रावसाहेब थोरात यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून म्हेत्रे यांनी गणेश हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, ताम्हाणे वस्ती येथे २० फुटी डांबरी रस्त्यावर १० फुटांचे विनापरवाना व अनधिकृत पत्रा व मुरुम वापरून कंपाऊंड केले आहे. याबाबत आयुक्त हर्डीकर यांच्याकडे सुनावणी झाली. त्यानुसार त्यांनी सदर अनधिकृत बांधकाम काढण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. या अनुषंगाने नुकतीच पालिकेचे अति. आयुक्त अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी जागेचे कागदपत्रे तपासून त्या अनधिकृत पत्राशेडच्या बांधकामावर हातोडा मारणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.