- निविदा रद्द झाल्याने पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांची यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा भ्रष्टाचार, अधिकार्यांची मनमानी, जाणिवपूर्वक बदललेल्या अटी-शर्ती, आर्थिक अपहार यासह अनेक विषयांनी कुप्रसिद्ध झाली होती.
कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दोन महिन्यांपासून हा विषय थंड बस्त्यात होता. मात्र काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेप आणि अधिकार्यांच्या टक्केवारीसाठी हा विषय पुन्हा ऐरणीवर घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू होता. मात्र, आज सोमवारी (दि. ६) रोजी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी अखेर ही निविदाच रद्द केली आहे.
ही निविदा रद्द करावी यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक तसेच भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी विरोध केला होता. सावळे यांनी आयुक्तांसमोर दुसऱ्यांदा सुनावणी घेऊन तांत्रिक मुद्द्यावर निविदेला विरोध केला. तसेच ही निविदा कशी चुकीची आहे, हे सिद्ध करीत आयुक्तांना जेरीस आणले. अखेर आयुक्तांना नमते घेत शहरातील रस्त्यांची यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्यासंदर्भातली ७४२ कोटींची निविदाच रद्द करावी लागली. त्यामुळे पालिकेच्या काही हजारांमध्ये असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.