न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून अनेक निविदा या संशयास्पदरित्या राबविण्यात आल्या आहेत. करोना काळात परिणामकारक उपाययोजना करण्यात आयुक्त अपयशी ठरले. एवढेच नाही तर आयुक्तांच्या संदिग्ध भूमिकेमुळे भाजपची प्रतीमा जनतेत अविश्वासाची ठरत आहे. असे अनेक गंभीर आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर केल्याने खळबळ उडाली आहे. आमदारांनी आरोप करताना सत्ताधाऱ्यांच्या चुकाही आयुक्तांवरच ढकलल्याचेही या पत्रातून समोर आले आहे.
दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र मिळाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विविध विभागांच्या प्रमुखांना तातडीचे पत्र पाठविले आहे. पत्राच्या अनुषंगाने विभागाच्या संबंधीची अद्ययावत माहिती पत्र मिळाल्यापासून ४८ तासांत सादर करण्याचे आदेश दिले आहे. जेणेकरुन आमदार लक्ष्मण जगताप यांना माहिती उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल. या प्रकरणी विलंब अपेक्षित नाही, असे विभाग प्रमुखांना बजावले आहे.
गेल्या तीन साडेतीन वर्षांत ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून महापालिकेत सत्तेच्या जोरावर कोणी काय उद्योग केले ते भाजपाच्याच नगरसेवकांनी उघडकीस आणल्यामुळे पक्षाची इभ्रत वाचविण्यासाठी चांगलीच चढाओढ रंगली आहे. चांगले झाले की पक्षाला श्रेय आणि चुकीचे झाले की आयुक्तांवर खापर असा प्रकार सध्या सुरू आहे. आयुक्तांनी सुरुवातीच्या काळात नेत्यांच्या चुकीच्या कामांना प्राधान्याने घेतलेले निर्णयच आज आयुक्तांच्या अंगाशी आले असून, त्यातूनच नवी चुकीची कामे करण्यास त्यांना भाग पाडले जात आहे. मात्र, आता अंग झटकणाऱ्या आयुक्तांना अडचणीत आणण्याचे सर्वच स्तरावर चाललेल्या प्रयत्नावरून आयुक्तांनी आता ‘चंबूगबाळ उचलावे’ असा तर अर्थ निघत नाही ना… ?


















