न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- तीन महिन्यांपासून करोना विषाणूपासून मुक्त असणा-या तीर्थक्षेत्र देहूत चौथ्या आठवड्यात बाधित रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. गुरुवारी (दि. ९) दुपारी तीन वाजेपर्यंत एकाच दिवसात ९ बाधितांच्या संख्येने अद्यापपर्यत उच्चांकी टप्पा गाठला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना सुमारे तीन महिने तीर्थक्षेत्र देहू यापासून मुक्त होते. लॉकडॉऊन शिथील झाल्यावर १३ जून रोजी रात्री करोनाबाधित २ रुग्ण आढळून आले. त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढू लागली. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ बाधित रूग्णांची एकाच दिवसांत संख्या झाल्याने २७ दिवसांतील रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, २३ रुग्ण बरे होवून मुक्त झाले आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत बाधित रुग्णांचा संख्या २८ आहे.
देहूकरांच्या मागणीने ग्रामपंचायत प्रशासनाने बुधवारपासून १४ दिवसांसाठी (दि. २१ पर्यंत) जनता कर्फ्यू लागू केला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. देहूतील वाढत्या संख्येमुळे आणि एकाच कुटुंबातील तीनहून अधिक संख्या बाधितांची असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे.


















