न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवडसह ग्रामीण भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह खडकी, मांजरी, मोशी, उत्तमनगर हे चारही उपबाजार १३ जुलै (सायंकाळी ६ नंतर) ते २४ जुलैदरम्यान बंद राहणार आहेत.
यामध्ये भाजीपाला, फळे, फुले, भुसार, केळी पान बाजाराचा समावेश आहे. तरी शेतकऱ्यांनी या काळात शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात लॉकडाऊन लागू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार १३ जुलैच्या सायंकाळी सहापासून २४ जुलैपर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शेतकरी, अडतदारवर्गाने नोंद घेऊन बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे बाजार समितीचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले.















