न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२२ नोव्हें) :- पुणे महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोच्या कामास प्रारंभ पिंपरीतून करण्यात आला आहे. पिंपरीतील बहुतांश खांबांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पवना नदीमधील पाच खांबांच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. संत तुकारामनगर येथील पहिल्या खांबाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस शिवाजीनगर ते पिंपरीपर्यंत मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मेट्रोच्या कामासाठी पिंपरीमध्ये जागा ताब्यात असल्यामुळे मेट्रो प्रशासनाला कामाची गती राखता आली आहे. मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या वृक्षांची तोडणी केल्यानंतर त्याचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये ४५६ खांबांपैकी १८३ खांबाचे काम पूर्ण झाले आहे, तर तीनशे चोवीस खांबांचा पाया पूर्ण झाला आहे. तसेच रूळ टाकण्यासाठी लागणारे ‘पिलर कॅप’ १०४ बसविण्यात आले आहेत. तर १०३८ कॅप तयार करून ठेवण्यात आले आहेत.
संत तुकारामनगर येथील मेट्रो स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून स्थानक उभारण्यासाठी आठ खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. कासारवाडी आणि फुगेवाडी येथील स्थानकाच्या कामासाठी पायाभरणीचे काम सुरू आहे. दापोडी येथील सीएमईपासून मेट्रो रेल्वेला नदी पार करावी लागेल. त्यामुळे नदीतील पाच खांबांच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे दिली आहे.