- महापौर माई ढोरे यांचे शहरातील खासगी रुग्णालयांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील ज्या खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर्स चालू करण्याची इच्छा आहे, त्यांनी कोविड केअर सेंटर चालू केल्यास महापालिकेमार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. सर्व खासगी रुग्णालयांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून तसेच वैद्यकीयपेशाचे आद्य कर्तव्य समजून कोविड केअर सेंटर्स चालू करुन महापालिकेच्या मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरातील खासगी रुग्णालयांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, प्रादुर्भाव व रुग्णांचे वाढते मृत्यू लक्षात घेता कोरोना संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
महापालिकेच्या सर्व दवाखाने, रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत आहेत, तसेच कोविड १९ ची मध्यम लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये क्वारंटाईन ठेवून पुढील उपचार दिले जात आहेत. तथापि कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या सेंटर्सवर ताण येऊ नये यासाठी आणखी कोविड केअर सेंटर्स उभारणे गरजेचे आहे.
शहरातील ज्या खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर्स चालू करण्याची इच्छा आहे त्यांनी कोविड केअर सेंटर चालू केल्यास महापालिकेमार्फत जी मदत आवश्यक असेल ती सर्व मदत करण्यात येईल. सर्व खासगी रुग्णालयांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून तसेच वैद्यकीयपेशाचे आद्य कर्तव्य समजून
कोविड केअर सेंटर्स चालू करुन महापालिकेच्या मोहिमेला हातभार लावावा असे मी पिंपरी चिंचवड शहराची प्रथम नागरिक या नात्याने शहरातील सर्व खासगी डॉक्टरांना आवाहन करित आहे.