न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हें) :- पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे आज शुक्रवार (दि. २३ नोव्हें) रोजी “पिंपरी-चिंचवडच्या विकासात पीएमआरडीएचे योगदान” याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीएमआरडीएचे किरण गित्ते यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पुण्यातील वाहतुकीच्या समस्या कायमच्या मार्गी लावण्याकरीता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ७२०० चौरस किलोमीटर लांबीचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्याची माहिती येत्या २७ नोव्हेंबरला सादर करणार आहे, असे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.
पीएमआरडीएचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, पीएमआरडीएच्या माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आगामी २० वर्षांचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला असून, पुढील ४० वर्षांसाठी दीड ते २ कोटी लोकसंख्येच्या आधुनिक जीवनशैलीस साजेसा, अशा विकासाचे नियोजन आम्ही करीत आहोत. पीएमआरडीए ही स्वायत्त संस्था असून महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या मुलभूत समस्या मार्गी लावण्याचे काम पीएमआरडीएच्या कार्याकक्षात येत नसून मुलभुत समस्या सोडून इतर सर्व विकासाभिमुख कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे.
पीएमआरडीएने ‘एल अॅण्ड टी इन्फ्रा’ या कंपनीस विकासकामांचे नियोजन व वाहतूक विकास आराखड्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कंपनीकडून दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला आहे. जानेवारी २०१९ मध्ये पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
मेट्रो, मोनोरेल उड्डानपूल, जंक्शन, फुटपाथ, मोनोरेल उभारणीची क्षमता पीएमआरडीएकडे आहे. राज्याच्या महामेट्रो कंपनीच्यावतीने कात्रज ते निगडी आणि वारजे ते चंदननगर या मागार्चे काम सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील वाघोली ते हिंजवडी, चांदणी चौक ते हिंजवडी, खडकवासला ते पुणे कॅन्टोमेन्ट हद्द आणि हिंजवडी ते चाकण या मार्गांचे नियोजन पुढील काळात करण्यात येणार आहे. यापुढील काळात औद्योगिक काॅरिडोअर पट्ट्यात रेल्वेसाठी नियोजन, हिंजवडी वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी या परिसरात ७०० एकर जागेवर मुक्त विकास प्रकल्प राबविणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी यावेळी सांगितले आहे.
















