- नागरिकांनो सावधान… मास्क सर्वत्र बंधनकारक करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- करोनाचा विषाणू हवेतून पसरतो यास जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) प्रमुखांनीही हे मान्य केलं आहे. सीएसआयआरकडून बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
सीएसआयआरचे प्रमुख शेखर मांडे यांनी यासंबंधी एक ब्लॉग लिहिला असून सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी समोर येत असलेले पुरावे, दावे-प्रतिदावे यावरुन हवेतून करोना पसरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. अशा परिस्थितीत काळजी कशी घेतली जावी याबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, “याचं उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे ते म्हणजे गर्दी करणं टाळा. सोबतच बंदिस्त असणाऱ्या कामांच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घ्या. तसंच बंदिस्त ठिकाणी मास्कचा वापर केलाच पाहिजे”.
करोनाचा विषाणू दोन मीटरपेक्षा जास्त पसरतो हा मुद्दा मान्य करण्यात आला आहे. “एखादी व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर काही थेंब हवेत सोडले जातात. मोठे थेंब वेगाने जमिनीच्या पृष्ठभागावर टिकतात तर छोटे थेंब बराच वेळ हवेत टिकतात”.