- शहर मनसेने घंटागाडीवरील ध्वनिक्षेपक यंत्र काढून केला घटनेचा निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घंटागाडीवर रोज सकाळी ‘तो का करे भैय्या? गाडीवाला आया, घरसे कचरा निकाल..’ या सुरात चक्क हिंदी-बिहारी गीते वाजवून नागरिकांना कचरा टाकण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी याशिवाय इतरही भागात अशाच प्रकारची हिंदी-बिहारी बेसुरी गाणी वाजवली जात आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड शहर मनसेने आक्रमक पवित्रा घेत, यापुढे शहरात घंटागाड्यांनी मराठीशिवाय अन्य कोणत्याही भाषेत किंवा गीतांद्वारे नागरिकांना कचरा टाकण्याचे आवाहन केले तर, खपवून घेतले जाणार नाही. अशी समज देत घंटा गाडीवरील ध्वनिक्षेपक यंत्र (स्पीकर) काढून घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
याबाबत शहर मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले असून पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘तो का करे भैय्या…गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ ही असली भसाडी गीते लावून, पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या नागरिकांऐवजी हे घंटागाडीचालक रोज सकाळी बिहारच्या जनतेला तर आवाहन करीत नाहीत ना? नागरिकांना रोज झोपताना महाराष्ट्रात झोपतो अनं सकाळ बिहारमध्ये होतीयं की काय? असला भास होतोय. राज्य शासनाच्या कामकाजात मराठी अनिवार्य असताना सर्रास हिंदी गाणी वाजवायचे काम बिनडोकपणे पालिकेकडून चालू आहे. त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी संबधित गाड्यांवरचे स्पीकर काढले आहेत. तसेच उद्यापासून परत असली गाणी वाजविली तर कडक कारवाईचा इशारा ही संबंधिताना देण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाचे हिंदी गीत व इतर हिंदी ध्वनिफितांऐवजी मराठी भक्तिगीते किंवा इतर मराठी गाणी यापुढं लावण्यात यावी आणि हिंदीचा हा फुकटचा प्रसार आणि प्रचार थांबवा, अशा आशयाच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनीदेखील अशा स्वरूपाची गाणी लावल्याचे निदर्शनास आल्यास जागेवर ते बंद करायला लावा. जर कोणी ऐकत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पि. चि. शहरातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना या पत्रकातून केले आहे,.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल पाटील, सुरेश सकट, गणेश माने, महेश केदारी, मंगेश भालेकर आणि इतर पदाधिकारी सहभागी होते.















