न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे. करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.
२) पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे.
३) तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.
४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.















