न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हें) :- लाडशाखीय वाणी समाजाच्यावतीने शनिवारी व रविवारी (दि. २४ व २५ नोव्हेंबर २०१८) अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन मारूंजी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातून एैंशी हजारांहून जास्त सभासदांनी ऑन लाईन नोंदणी केली असून पन्नास हजारांहून जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (दि. २४ नोव्हेंबर) महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ :४५ वाजता होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
महाअधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी ४ :३० वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राजू शेट्टी, श्रीरंग रणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात मांडण्यात येणारे ठराव पुढील प्रमाणे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले बी.टी. बधान यांच्या नेतृत्वाखाली महाअधिवेशन संयोजन समितीने एका राज्यस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीने सर्व समाजघटकांशी संवाद साधून, सर्वांगिण अभ्यास करुन, समाजातील खर्चिक, जुन्या, चुकीच्या रूढी परंपरा बंद करण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत. आधुनिक विचारांची कास धरुन अभ्यासपूर्ण नोंदी केल्या आहेत. त्या अनुषंगाने महाअधिवेशनात काही ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा करून ठराव संमत करण्यात येतील असे महासंघाच्या वतीने अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी (पुणे) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
यामध्ये कुटुंब सक्षमीकरण, महिला व बाल सक्षमीकरण, करिअर मार्गदर्शन व लघुउद्योजकांसाठी मदत अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. समाजातील नविन पिढीने आधुनिकता अंगिकारणी असून आधुनिक पध्दतीने ऑनलाईन शिरगणती करण्यात आली. यामध्ये 85 हजार समाज बांधवांनी आपली माहिती नोंदविली आहे. समाजाला लोकसंख्या गणनेचे महत्व पटवून देण्यासाठी शामकांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती मागील आठ महिन्यांपासून काम करीत होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे जगभरात राहणाऱ्या 85 हजार व्यक्तींनी www.witoindia.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील समाजबांधवांनी ऑनलाईन नोंदणीत सहभाग घेतला. लाडशाखीय वाणी समाजाचा इतिहास ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करण्याचे नियोजन महासंघाने केले आहे.
लाडशाखीय वाणी समाजाचा इतिहास खुप प्राचीन आहे. मध्य आशियाई देशांमधून (अफगाणिस्तान, सायबेरिया, उजबेकिस्तान, पाकिस्तान आदी) या समाजाचे कसे – कसे स्थलांतर झाले. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात या राष्ट्रभक्त समाजबांधवांनी कसे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर समाजातील सन्माननिय व्यक्तींनी देशाच्या विकासाठी केलेले कार्य याचा माहितीपुर्ण आढावा ग्रंथ स्वरुपात महाअधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात येणार आहे. डॉ. जगदीश चिंचोरे यांच्या नेतृत्वाखालील संपादकीय मंडळाने या ग्रंथांची निर्मिती केली आहे. हे पुस्तक समाजासाठी विशेषतः नव्या पिढीसाठी मोठा दस्तऐवज ठरेल, असे पुणे महानगर समन्वयक विवेक शिरोडे यांनी सांगितले आहे.
















