न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- तापकीरनगर येथील एका घरात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना काल (गुरुवारी) रात्री घडली. मात्र भारतीय जनता युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी प्रसंगावधान दाखवत अग्निशामक दल आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं शॉर्टसर्किट कशामुळे झाले याची पाहणी केली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी यावेळी राज तापकीर यांचे आभार व्यक्त केले.
या घटनेविषयी बोलताना राज तापकीर म्हणाले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून लिकेजमुळे घरातील भिंती भिजून शॉर्टसर्किट होण्याची भीती असते. शक्यतो घरातील इलेक्ट्रिक वायरी जुन्या असतील तर शॉर्टसर्किट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेर जाताना घरातील दिवे व इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्यतो बंद करूनच घरातून बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान व महावितरणचे कर्मचारी यांचेही राज तापकीर यांनी यावेळी आभार व्यक्त केले.


















