न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व उद्योगात काम करणारा कामगार रेडझोन किंवा कंटेन्मेंट झोनमधून येत असला तरी त्यास महापालिकेच्या पूर्वपरवानगीची गरज लागणार नाही. कामगार आपल्या वाहनाने ये – जा करू शकतात, असा नवीन आदेश महापालिकेने काढला आहे. त्यामुळे सर्वच कामगारांना प्रवास करणे सुलभ झाले आहे.
या निर्णयाचे उद्योग क्षेत्रातून स्वागत केले जात आहे. दहा दिवसांचा लॉकडाऊन शुक्रवारी (दि. २३) मध्यरात्री संपल्यानंतर महापालिकेने अनेक नियम व अटी शिथिल करीत कामगारांसह पथारी, हातगाडी विक्रेते, दुकानदार व व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
एमआयडीसीतील कंपन्या व उद्योग १०० टक्के कामगार क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार्यालय व आयटी कंपनीत जास्तीत जास्त ५० टक्के मनुष्यबळ ठेवता येणार आहे. शासकीय कार्यालये केवळ १५ टक्के मनुष्यबळ ठेवता येणार आहे. मालवाहतुकीच्या वाहतुकीसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र, आंतरजिल्हा आंतरराज्य प्रवासी वाहतूक पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही.