न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पंधरा हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत १५०६७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज महापौर कक्षातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली आहे. विशेष म्हणजे या महिला कर्मचाऱ्याचे कामाचे स्वरूप पालिकेच्या रुग्णालयांमधील बिलांच्या फायलीबाबतचे आहे.
डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत महापालिकेतील ५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉररूमध्ये देखील करोनाने शिरकाव केला आहे. वॉररूममधील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे.
विशेष खबरदारी म्हणून पालिकेतील या महिला कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना शोधून त्यांच्यादेखील कोरोना तपासण्या केल्या जाणार आहेत.