- पुणे, नाशिक येथे वाणी समाजाला वसतिगृह बांधण्यासाठी जागा देऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मारुंजी (पिंपरी चिंचवड – दि. २४ नोव्हें) :- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात अर्थ, उद्योग, व्यापार क्षेत्रात लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. भावी पिढीला शिक्षणासाठी पुणे, नाशिकसारख्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहाची गरज असल्याने समाजाला या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी सरकार जागा देईल, असे जाहिर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुणे (मारुंजी) येथे आयोजित केलेल्या लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एन. वाणी, अनिल चितोडकर, निलेश पुरकर, उद्योजक गोविंद शिरोळे, राजेश कोठावदे, गजानन मालपुरे आदींसह राज्यभरातून आलेले ४० हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.
या वेळी ‘समाज भूषण’ या स्मरणिकेचे प्रकाशन व वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच समाजाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला आणि दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांची शैक्षणिक जबाबदारी समाजाने घेतली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाला ज्या ज्या वेळी आवश्यकता पडली तेव्हा तेव्हा लाड समाज लढला. स्वातंत्र्य लढ्यातही या समाजाचे मोठे योगदान आहे. व्यापार आणि उद्योजकता जपत, अर्थव्यवस्थेचा कणा भक्कमपणे उभा करुन व्यवसाय व्यापारात हा समाज नेहमी अग्रेसर राहिला आहे. वाणी समाजाने विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे, अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. हा समाज उ्दयोग व्यापारातून इतर गरजूंना रोजगार देणारा आहे. इतर समाजालाही बरोबर घेऊन महाराष्ट्राला नेहमी प्रथम क्रमांकावर नेण्यात या समाजाचे कार्य उल्लेखनीय आहे. आज उद्घाटन झालेल्या ‘वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे नाव आगामी १० वर्षात राष्ट्रीय स्तरावर आदराने घेतले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी यांनी सांगितले की, समाजाच्या वतीने दुष्काळी भागातील ३०० मुलं दत्तक घेऊन त्यांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा सर्व खर्च आणि दुष्काळी भागातील ३०० गावं दत्तक घेऊन त्या गावांचा सर्वांगीण विकास समाजाच्या वतीने करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच भावी पिढीला शिक्षणासाठी पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वसतिगृहासाठी शासनाने जागा द्यावी अशीही मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्योजकता मार्गदर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रात उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यासाठी २०० स्टॉल उभारण्यात आले आहेत.
स्वागत आर. एन. वाणी, सुत्रसंचालन राहुल सोलापूरकर व समीरा गुजर यांनी केले. आभार अभय नेरकर यांनी मानले.
















