न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- “पाहतां त्रिभुवनीं हो दुजा न देखो नयनीं । एका मोरयावांचूनी हो मोक्षदाता ।।१ ।। अहो, येई तूं मोरया हो त्रयलोक वीसावया। जडजीव तारावया हो तूंचि एक ।।२ ।। ” असा भाव व्यक्त करत दरवर्षी वाजतगाजत येणारे गणराय यंदा थेट नियोजित स्थळीच विराजमान केले जाणार आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सवावर सावट असल्याने सर्वच लहानमोठ्या मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय घरोघरी विराजमान होणाऱ्या गणेशाचीही आचारसंहितेच्या कक्षेत राहूनच प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तब्बल दहा दिवस चालणारा आणि अख्ख्या जगात प्रसिद्ध असलेला पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे शहराची शान आहे.
अबालवृद्ध या उत्सवाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहात असतात. जेवढ्या या दिमाखात गणेशाचे आगमन होते, तेवढ्याच भावपूर्णतेने गणेशाचे विसर्जनही शहरात होत असल्याने हा अनोखा असलेला उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मानाचे गणपती आणि घरगुती गणपतींची वेगवेगळ्या मुहुर्तावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मोठ्या मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव करणार असल्याचे जाहीर केले होते. पोलिसांनी आणि महापौरांनीही गणशमंडळाना याबाबत आवाहन केले आहे.















