न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २८ नोव्हें) :- पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्यावतीने (पीएमआरडीए) आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयात आज बुधवार (दि २८) रोजी पुणे महानगर प्रदेशासाठीच्या वाहतूक आराखड्याची माहिती देण्यात आली. यावेळी खरवडकर यांनी सादरीकरण केले. अधिक्षक अभियंता रिनाज पठाण उपस्थित होत्या.
नगर नियोजनकार विवेक खरवडकर म्हणाले, पुढील २० वर्षांचा म्हणजे २०३८ पर्यंतचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. एल ऍण्ड टी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. पुणे महानगरपालिका हद्द (३३२ चौरस कि.मी. क्षेत्रफळ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द (२१० चौरस कि. मी. क्षेत्रफळ) असे एकूण ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा यामध्ये समावेश केला आहे. तर, उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा या दहा तालुक्यांचा समावेश आहे. एकूण २ हजार १७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या सहाय्याने पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर वाहतूक कोंडी आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये रेल्वे वाहतूक व बस वाहतूक या सार्वजनिक वाहतूक योजनावर भर देण्यात आला आहे. सध्यस्थितीत एकूण वाहतूक वर्दळीच्या ७१ टक्के वाटा हा खासगी मोटार व दुचाकी वाहनांचा असून फक्त २९ टक्के वाटा हा बस व रिक्षा या सार्वजनिक वाहनाचा आहे.
सार्वजनिक वाहतूक वर्दळीचा सहभाग ५० टक्यापर्यंत वाढविण्यासाठी आणि खाजगी वाहतूक ५० टक्यांपर्यंत कमी करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पीएमआरडीएचे नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी सांगितले.
















