न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला गतवर्षीपेक्षा १० टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये. त्यासाठी सध्याची पाणीपुरवठ्याची परिस्थिती आणि पाणीपुरवठा कपात करण्याबाबत आज (बुधवारी) पदाधिकारी आणि अधिका-यांची बैठक झाली.
बैठकीत पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि कपातीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगत आयुक्त आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे. दिवसाला ४४० एलएलडीच पाणी धरणातून उचलावे, असे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. ४४० एमएलडी पाणी उचलल्यास जुलै २०१९ पर्यंत पाणी पुरु शकते. परंतु, पावसाने ओढ दिल्यास अडचण होईल. त्यामुळे पाणी कपात करणे आवश्यक आहे. अनधिकृत नळजोड मोहिम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोड, पाणीगळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका पवना नदीच्या रावेत बंधा-यातून पाणी उपसा करते. या बंधार्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच,पाणीसाठा अधिक व्हावा म्हणून बंधार्याची उंची वाढविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यादृष्टीने महापालिकेने बंधार्याचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. बंधार्यात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढणे. बंधार्याची उंची वाढविणे आदी कामे जलसंपदा विभागामार्फत केली जाणार आहेत. काम कसे आणि केव्हा करायचे, यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून प्रतिसाद मिळताच प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे.
महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत उपस्थित होते.
















