न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड / पुणे (दि. २९ नोव्हें.) :- विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन बंधनकारक केले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांद्वारे केल्या जाणाऱ्या अध्यापनासोबतच ग्रंथालयाचे योगदानही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वाचे असते, म्हणूनच नॅक मूल्यांकनामध्ये ग्रंथालय विभागाचे कामकाज, ग्रंथपालाची भूमिका या निकषांना प्रामुख्याने महत्व देण्यात आले आहे.
मात्र याबाबत अजूनही म्हणावी तितकी जागरूकता झालेली नाही, म्हणूनच याविषयासंबंधी अधिक माहिती व तपशील ग्रंथपालांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘नॅक मूल्यांकन मिळवण्यासाठी ग्रंथालयांची तयारी’ (Library Readiness for NAAC Accreditation) या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारची ही राज्यातील पहिलीच कार्यशाळा आहे. शुक्रवार (दि. ३०) रोजी होणाऱ्या या राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यातील मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये राज्यातील सुमारे दोनशे महाविद्यालयांचे ग्रंथपाल व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ् व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी दिली.
















