न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी परिसरातील बेशिस्त दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशाप्रकारे वाहने पार्क केली जात असून, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सूचनांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
पिंपरी कॅम्पातील बाजार परिसरात सकाळी आठ ते दुपारी १२ व सायंकाळी पाच ते रात्री नऊ दरम्यान अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र वाहतुकीस अडथळा करतात. शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी याबाबत वाहतूक पोलिसांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी काही दुकानदारांना नोटीस बजावली आहे. दुकानांबाहेर वाहने बेशिस्तपणे पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे दुकानांबाहेर पार्किंग नियमानुसार असावे, सुरक्षारक्षक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वेळेचे नियम पाळावेत, वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.