न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख २५ गुन्हेगारांचा शोध घेत पेट्रोलिंग करत असताना खंडणी दरोडा विरोधी पथक भोसरी येथील वखार महामंडळ, खाणीजवळ आले. कर्मचारी प्रवीण कांबळे, आशिष बनकर यांना माहिती मिळाली की, अंकुशराव लांडगे सभागृहा समोरील लाईटच्या पोल जवळ एक तरुण त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. यावरून पोलिसांनी परिसरात सापळा लावला.
मंगळवारी (दि. ८) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेऊन त्याच्याकडून ३० हजार ४०० रुपये किमतीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (राउंड) जप्त केली. पोलिसांनी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश दत्तात्रय कोठावडे (वय २४, रा. निर्मन टॉऊनशिप शेजारी, काळेपडळ, हडपसर, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकाश हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.















