- शहराला कोरोनापासून मुक्ती मिळावी म्हणून केली पूजा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- कोरोना (कोविड १९) काळाचे भान न ठेवता पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेमध्ये बुधवारी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पूजा केली. त्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. शहराला कोरोनापासून मुक्ती द्यावी, या भावनेने एक भक्त म्हणून पूजा घातल्याची प्रतिक्रिया मिसाळ यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.
मिसाळ यांची बुधवारी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पुजेचा विधी करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी पुजेसाठी आणि त्यांच्या अनेक कार्यकर्ते पुजेलाच नव्हे, तर अभिष्टचिंतन करण्यासाठी गटा गटाने येत होते. काही पुष्पगुच्छ घेऊन येत होते. तर, काहींनी केक कापून आनंद साजरा केल्याचे चित्र पालिकेत दिसत होते. राष्ट्रवादी पक्ष पुरोगामी मानला जातो. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारण्यापुर्वी पुजा बांधल्याची चर्चा पालिकेमध्ये होती. या बाबत मिसाळ यांना विचारले असता, ते म्हणाले पिंपरी – चिंचवड मोरया गोसावींचे शहर म्हणून ओळखले जाते. मी गणेश भक्त असल्याने गणेशाची पूजा केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरवासीयांना कोरोनापासून मुक्त मिळावी अशी पार्थना करण्यासाठी मी पूजा केली.
शहरातील कोविड सेंटरमध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, मी गुरुवारपासून (दि. १०) कोविड सेंटरमधील सुविधांची पाहणी करणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बुधवारी केली. मिसाळ यांनी बुधवारी (दि. ९) काटे यांच्याकडून पदाभार स्वीकारला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पिंपरी – चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळोखे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.
ऑटो क्लस्टर आणि मगर स्टेडियमवर कोविड सेंटर सुरु होऊनही नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाही असे विचारले असता मिसाळ म्हणाले, कोविड सेंटरबाबत पालकमत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. महापालिका आयुक्तासमवेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच गुरुचार पासून कोविड सेंटरची पाहणी करून अडचणी समजून घेऊन त्या सोडविल्या जातील. कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने आणि जावेद शेख यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पक्षाचे नुकसान झालेच आहे, असेही ते म्हणाले.