न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हें) :- श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची मागणी, होत आहे. त्यासाठी प्रत्येक खासदाराने या कायद्याचे समर्थन करावे आणि रामभक्त तसेच संतांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक खासदाराला याबाबतचे निवेदनही देण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनाही याबाबतचे निवेदन विहिंपतर्फे त्यांच्या निगडी प्राधिकरणातील निवासस्थानी देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात, संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, संघाचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, विहिंपचे प्रांत मंत्री विजय देशपांडे, विहिंपचे प्रांत सेवा कार्य प्रमुख दादा ढवाण, विहिंपचे शहराध्यक्ष शरद इनामदार, शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दलाचे प्रांतपालक अशोक येलमार, शहर संयोजक नाना सावंत, वनवासी कल्याण आश्रमचे नरेंद्र पेंडसे, पुरुषोत्तम अनंतपुरे, दुर्गा वाहिनीचे प्रांतपालक पांडुरंग फाटक, सहकार भारतीचे जिल्हा सचिव औदुंबर नाईक, भाजपाचे शहर प्रवक्ता अमोल थोरात, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी या वेळी उपस्थित होते.
खासदार साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात हिंदू समाज १५२८ पासून भव्य राममंदिर उभारण्यासाठी संघर्ष करीत आहे. या मुद्द्यावर सातत्याने चर्चा होऊनही यश आलेले नाही. न्यायपालिकेच्या माध्यमातून या मुद्द्यावर समाधान व्हावे म्हणून १९५० पासून हा मुद्दा प्रयत्न सुरू आहे. मात्र न्यायालयात निकाल लागण्याचा कालावधी अनिश्चित आहे. श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा १५२८ पासूनच हिंदू समाजाचा दृढ संकल्प आहे. अनावश्यक आणि अनाकलनीय विलंब हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा, हेच याचे एकमात्र समाधान होऊ शकते.
राज्यसभेचे खासदार म्हणून आपण रामभक्त आणि संत समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात आणि श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाच्या कायद्याचे समर्थन करावे, अशी विनंती या निवेदनातून खासदार अमर साबळे यांना विहिंपतर्फे करण्यात आली आहे.
















