पुणे (दि. ३० नोव्हें.) :- पुण्यातील पाटील इस्टेट परिसरातील झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीत २५० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत. यामध्ये अनेक झोपडीधारकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने म. न. पा. आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे. पिडीत कुटुंबाना महापालिकेच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत मागण्यांचे निवेदन दिले आहे.
यावेळी उपमहापौर सिध्दार्थ धेडे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, नगरसेविका सुनिता वाडेकर, सोनाली लांडगे, हिमाली कांबळे, अशोक शिरोळे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, बस्वराज गायकवाड, संतोष लांडगे, रमेश तेलवडे, चव्हाण, दादबा वारभवण व रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या निवेदनात पाटील इस्टेट झोपडपट्टीतील आगीत ज्यांची घरे जळाली त्यांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे, प्रत्येक घरामागे म. न. पा. १५००० हजार रुपये खर्च करते तो खर्च अपुरा असुन प्रत्येक घराला किमान ५००००/- रूपये खर्च केला पाहिजे, जेणेकरून त्यांचे घर उभे राहिल, या आगीत त्यांचा संपूर्ण संसार, महत्वाचे कागदपत्रे जळाली आहेत ते त्यांना त्वरित मिळाली पाहिजेत तशी व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा या निवेदनात अंतर्भाव आहे.
शहरात दररोज कुठे ना कुठे झोपडपट्टीमध्ये आग लागण्याचे प्रस्थ वाढत आहे. यामुळे अनेकांचा संसार उध्वस्त होत आहेत. सरकार आणखी किती गोर-गरीबांचे संसार उध्वस्त होण्याची वाट पाहणार असल्याचा प्रश्न यावेळी उपस्थितांनी आयुक्तांना विचारला आहे.
राज्य शासन व पुणे महानगरपालिका यांनी त्वरित योग्य ते पुनर्वसन करावे, त्याचा आराखडा तयार करण्यात यावा. महापालिका स्मार्टसिटी होत असताना झोपडपट्ट्या प्रथम स्मार्ट करा, नंतर शहर स्मार्ट करा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने झोपडपट्टी प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, अशी इशारावजा मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने म. न. पा. आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
















