- अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन..
- पतित पावन संघटनेचे सायबर शाखेला निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्थान व जगातील सर्व शिवभक्तांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा वापर करून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो बनवण्याचा प्रताप अज्ञात महाभागाने केला आहे. त्या विरोधात पतित पावन संघटनेने मुंबईच्या सायबर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त यांना निवेदन दिले आहे व त्या गुन्हेगाराचा छडा लावून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा व फोटोचा काही राजकिय कार्यकर्ते वा नेते राजकिय हेतूने प्रेरित होऊन वारंवार वापर करून महाराजांच्या अस्मितेला धक्का पोहोचविण्याचे काम करीत असतात. यामुळे तमाम हिंदू व मराठी बांधवांना चिथावण्याचे काम केले जात आहे. कोणीही उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचं काम करत असेल तर त्याला कठोर शासन झालेच पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रत्येक हिंदू भावनेने जोडला गेला आहे. त्यांची महानता हा सर्व भारतीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अशा गोष्टीने लोकभावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल करावा. अन्यथा पतित पावन संघटनेच्या वतीने मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने आणि जनआंदोलन उभे करण्यात येईल, असे या निवेदनात पतित पावन संघटनेने म्हटले आहे.
निवेदनावर पतित पावन संघटनेचे मुंबई शहर कार्याध्यक्ष शशांक राणे, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख राजेश मोटे, मुंबई शहर संपर्क प्रमुख सिद्धेश बावकर, मुंबई शहर सरचिटणीस अॅड सचिन पाटील, प्रसिद्धी पमुख अॅड सर्जेराव पाटील यांच्या सह्या आहेत.















