न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- लॉकडाऊनमधला तोटा भरून देण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे केली आहे. एकूण तोटा १८३ कोटी ५८ लाख रुपयांचा असून ६० व ४० टक्के याप्रमाणे तो विभागून द्यावा, अन्यथा कर्मचाऱ्यांचे वेतन करायलाही पैसे नसल्याचे ‘ पीएमपी’ने म्हटले आहे.
व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना या संदर्भातले पत्र दिले आहे. पुणे महापालिकेने ११० कोटी १५ लाख आणि पिपंरी चिंचवड महापालिकेने ७३ कोटी ४३ लाख रुपये पीएमपीला द्यावेत, असे जगताप यांनी म्हटले आहे. पुढील वर्षीच्या तूटीसाठी मिळणाऱ्या रकमेतून ही समायोजीत करण्याचे आश्वासनही त्यांनी या पत्रात दिले आहे.
कोरोना टाळेबंदी काळात १ एप्रिल ते ऑगस्ट अखेर पीएमपीचे एकूण २२६ कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. आता पीएमपी सुरू झाली असली तरी रोजचे उत्पन्न फक्त ४ लाख रूपये आहे. या रकमेतून वेतन देणे सुद्धा अवघड आहे.
कोरोना काळात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची गरज ओळखून पीएमपीने दोन्ही महापालिकांना मिळून त्यांच्या कार्यक्षेत्रात १ हजार ८२२ बस पुरवल्या होत्या. याशिवाय चालकवाहक व अन्य असे एकूण ४ हजार ८५ कर्मचारीही दिले होते. या काळात ही सेवा सुरु ठेवल्याने पीएमपीला एकूण मिळून ८४ कोटी ४५ लाख रुपयांचे देणे झाले आहे.















