न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- वाकड पोलीस लाईन जवळील टेलिफोन कॉलनीकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन जवळ एका ठेकेदाराकडून सीमाभिंतीचे काम चालू आहे. त्या कामाच्या दरम्यान पाईप फुटल्याने त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
मागील तीन दिवसांपासून हा प्रकार चालू आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. परंतु, तरीसुद्धा आज ३ दिवस उलटून गेले, तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. त्यामुळे अपना वतनचे चिंचवड विभागाध्यक्ष फारुख शेख यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असताना येथे मात्र लाखो लीटर वाया जात असताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे उदास धोरण दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारंवार पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु, पालिकेचे अधिकारी अशा प्रकारच्या पाणीगळतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे वाकड परिसरात पाणी गळतीची तक्रार देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी व पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा दुरुस्त करावा. तसेच सीमाभिंतीचे काम करणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हा दाखल कारवा, अशी मागणी अपना वतनचे चिंचवड विभागाध्यक्ष फारुख शेख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.










