- मोहिमेला चिंचवडगाव परिसरात प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महापालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम संपूर्ण चिंचवड प्रभागामध्ये सुरू करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आज (सोमवारी) प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम कोविड -१९ साथ नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व नागरिकांनी तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही मोहीम १५ सप्टेंबरपासून २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत राबविण्यात येणार आहे.
जिल्हाप्रमुख चिंचवडे म्हणाले, कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा चिंचवड क्षेत्रात आजपासून प्रारंभ झाला आहे. त्या अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी नागरिकांनी मनात कोणताही संकोच न ठेवता स्वतः हुन पुढाकार घेत आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाची तपासणी करून घ्यावी. तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. नागरिकांनी कोणतेही आजार लपवू नयेत. कोरोनाची भीती बाळगू नये. आपल्याला जो त्रास होत आहे. तो प्रामाणिकपणे तपासणी करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगावा. जेणेकरून कोरोनाची लक्षणे असल्यास वेळीच उपचार करण्यास मदत होईल. तसेच बाहेर फिरताना काळजी घ्यावी. सतत मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही चिंचवडे यांनी केले.















